नौकानयन करता येणे
ही एक असामान्य दैवी देणगी आहे.
जगात त्यासारखं दुसरं काही नाही.
माझ्यासाठी सर्वोच्च समाधानाची गोष्ट म्हणजे
एखाद्या बंदरातून निघाल्यानंतर,
ही बोट आणि आपला चमू
आपण सुरक्षितपणे दुसऱ्या बंदरापर्यंत नेऊ
हा विश्वास वाटणे.
मग ते बंदर तीन, चार, पाच,
सहा हजार मैल दूर का असेना.
मला वाटतं, समुद्रावरचा प्रवास
म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य.
आपल्या स्वभावानुसार जगण्याची सुवर्णसंधी.
तिथे दुसरं काही करणं शक्यच नाही.
बोटीतल्या सहकाऱ्यांसमोर
तुम्ही जणु नग्नावस्थेत असता.
ती एक छोटीशी जागा असते.
आमची 'मेडन' बोट ५८ फूट लांबीची आहे.
५८ फुटी जहाजामध्ये १२ स्त्रिया.
म्हणजे तुम्ही अक्षरशः एकमेकांसमोर असता.
म्हणून तिथे स्वतःच्या
स्वभावानुसारच वागावं लागतं.
माझ्यासाठी समुद्रप्रवासातला
सर्वात मोठा क्षण कोणता,
तर ज्या क्षणी जमीन दिसेनाशी होते, तो.
तो एक अवर्णनीय क्षण असतो.
(दीर्घ श्वास)
साहसाचा. मागे न फिरण्याचा.
फक्त आपण, आपली बोट आणि पंचमहाभूतं.
प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी हे अनुभवावं
अशी माझी इच्छा आहे.
आपण जमिनीपासून जितके दूर जाऊ,
तितके जास्त स्वतःसारखे होत जातो.
तिथे फक्त तुम्हीच असता.
पुढच्या ठिकाणावर कसं पोहोचायचं?
आपले जीव कसे सांभाळायचे?
एकमेकांची काळजी कशी घ्यायची
आणि सुखरूप पैलतीरी कसं पोहोचायचं?
मी व्याख्यानं द्यायला जाते, तेव्हा
हा प्रश्न मला सर्वात जास्त विचारला जातो:
महासागरी शर्यतीत भाग कसा घ्यायचा?
हा अतिशय चांगला प्रश्न आहे.
मला सांगायला आवडलं असतं, की
"आधी मला तसा आभास झाला.
मग ते माझं स्वप्न बनलं,
मग तो माझा ध्यास झाला."
पण अर्थात, आयुष्य तसं नसतं.
एक गोष्ट लोकांना सांगण्याची
मला फार उत्कंठा आहे.
माझं आयुष्य अ बिंदूपासून
ब बिंदूकडे गेलं नाही.
कारण आपलं आयुष्य अ पासून ब पर्यंत गेलं,
असं किती लोक सांगू शकतील?
किती लोक "मी हे करेन" म्हणतात,
आणि तसं करतात?
म्हणून मी सत्य तेच सांगते.
ते असं, की वयाच्या १५व्या वर्षी
मला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं.
वैतागलेल्या मुख्याध्यापकांनी
एक वैतागाचं लांबलचक पत्र लिहिलं.
माझ्या वैतागलेल्या आईला.
त्याचा अर्थ इतकाच, की ट्रेसीची
सावली जरी शाळेच्या दारात पडली,
तर पोलिसांना बोलवू.
आईने मला जवळ घेतलं आणि ती म्हणाली,
"डार्लिंग, शिक्षण हे
प्रत्येकाला जमतंच असं नाही."
त्यानंतर तिने मला
सर्वात मोलाचा सल्ला दिला.
ती म्हणाली, "आपल्यापैकी प्रत्येकाला
एखाद्या विषयात गती असते.
तो विषय कोणता, ते शोधून काढायला हवं."
आणि वयाच्या १६व्या वर्षी तिने मला
पाठीवर बॅगपॅक बांधून ग्रीसमध्ये पाठवलं.
मी बोटींवर कामं करू लागले.
ठीक चाललं होतं.
माझं वय सतरा वर्षांचं होतं.
आपल्याला काय करायचंय ते कळत नव्हतं.
प्रवाहाबरोबर वाहत जात होते.
अटलांटिक महासागरावरच्या दुसऱ्या सफरीवेळी
कप्तानाने मला विचारलं,
"तुला बोट चालवता येते?"
मी म्हटलं, "छे! मला नाही येत.
भागाकार शिकण्यापूर्वी शाळेने हाकललं."
तो म्हणाला, "आपल्याला ते यावं,
असं नाही वाटत तुला?
मी बोटीवरून खाली समुद्रात पडलो, तर?
आयुष्याकडे त्रयस्थासारखं बघणं थांबव.
आपण काय करतो ते नुसतं पाहू नकोस.
त्यात प्रत्यक्ष भाग घे."
आणि त्या दिवशी
माझ्या संपूर्ण आयुष्याला सुरुवात झाली.
दोन दिवसांत मी बोट चालवायला शिकले.
मी, आकडे न आवडणारी व्यक्ती.
आकड्यांना गूढ चिन्हलिपी मानणारी.
यामुळे माझ्या कल्पनेपलीकडचे
मार्ग आणि संधी मला मिळाल्या.
मी व्हिटब्रेड पृथ्वीप्रदक्षिणा शर्यतीच्या
बोटीवर स्थान मिळवलं.
माझ्याबरोबर सतरा
दक्षिण आफ्रिकन पुरुष होते.
माझं वय होतं एकवीस वर्षं.
ते नऊ महिने मला फार मोठे वाटले.
मी स्वयंपाकी म्हणून गेले होते.
मी शेवटपर्यंत टिकून राहिले.
शर्यत संपली,
तेव्हा मला कळलं, की
शर्यतीत २३० लोकांनी भाग घेतला होता.
आणि तीन महिला.
त्यापैकी मी एक होते.
मी फार वाईट स्वयंपाक करते.
पण मी जहाज उत्तमरीत्या चालवू शकते.
मला वाटतं, माझ्या आयुष्यातला
दुसरा महत्त्वाचा विचार असा, की
"कोणताही पुरुष मला त्याची बोट
कधीच चालवू देणार नाही."
हे आजही खरं आहे.
व्हिटब्रेड शर्यतीच्या ३५ वर्षांत
संपूर्ण महिला चमूची जहाजं वगळता,
फक्त दोन महिला खलाशांनी भाग घेतला आहे.
यातूनच मेडन बोटीचा जन्म झाला.
त्यावेळी मला वाटलं,
"मला याविरुद्ध लढलं पाहिजे."
आपण याविरुद्ध लढणार आहोत
याची पूर्वकल्पना नसूनही
एखादं बदक पाण्यात उतरावं
तशी मी सहज सुरुवात केली.
माझ्या स्वभावातल्या काही गोष्टी
मलाच नव्याने समजल्या.
माझ्यातल्या लढाऊ वृत्तीचा शोध लागला.
माझ्यात स्पर्धक वृत्ती आहे हे समजलं,
जे यापूर्वी ठाऊक नव्हतं.
माझ्या मनातला दुसरा ध्यास समजला.
समानतेचा आग्रह.
हा ध्यास मी सोडू शकले नसते.
हा ध्यास फक्त माझ्यापुरता नव्हता.
मला बोट चालवायला मिळावी,
माझे खलाशी निवडावे
आणि चमू गोळा करावा,
स्वतः पैसे उभे करावे आणि बोट घ्यावी,
मी स्वतः नौकाचालक होणं हा ध्यास नव्हता.
तर सर्व स्त्रियांसाठी.
यावेळी माझ्या लक्षात आलं, की
कदाचित आपण यापुढच्या आयुष्यात
हेच काम करणार आहोत.
बऱ्याच काळाच्या प्रयत्नांनी पैसे जमवून
१९८९ सालच्या
व्हिटब्रेड पृथ्वीप्रदक्षिणा शर्यतीला गेलो.
तिथे आमच्या भोवती मोठमोठ्या
लक्षावधी पौंड्स किंमतीच्या बोटी होत्या.
त्यातले सर्व खलाशी पुरुष होते.
खास शर्यतीकरिता बनवलेल्या
त्या नव्याकोऱ्या चकचकीत बोटी
पाहून आमच्या लक्षात आलं, की
आपल्याजवळ असं काही नाही.
आम्हांला सुधारणा करणं भाग होतं.
इतकी प्रचंड रक्कम देण्याइतका विश्वास
कोणी आमच्यावर ठेवला नसता.
मग मी माझं घर गहाण ठेवलं.
आम्हांला एक नादुरुस्त बोट सापडली.
तिलाही इतिहास होता.
व्हिटब्रेड शर्यतीत
तिने दोनदा पृथ्वीप्रदक्षिणा केली होती.
ती दक्षिण आफ्रिकेत होती.
कशीबशी एका माणसाला विनंती करून,
त्याच्या जहाजावरून
आम्ही तिला इंग्लंडला आणवलं.
बोटीची दुर्दशा बघून
माझ्या चमूतल्या मुली घाबरल्या.
एका यार्डात आम्हांला मोफत जागा मिळाली.
तिथे नेऊन आम्ही तिची पुनर्रचना केली.
तिचे भाग सुटे केले.
हे सगळं आम्ही स्वतःच केलं.
त्या यार्डात स्त्रिया आलेल्या
याआधी कोणी पाहिल्या नव्हत्या.
ते फार मजेशीर होतं.
रोज सकाळी आम्ही तिथे गेलो, की
लोक वेड्यासारखे आम्हांला बघत राहत.
पण त्याचे फायदेही होते.
कारण ते सगळे आम्हांला मदत करत.
आम्ही म्हणजे एक नवलाईची गोष्ट बनलो होतो.
कोणीतरी आम्हांला एक जुना जनरेटर
आणि एक इंजिन दिलं.
"हा जुना दोर हवा का?"
"होय."
"जुनी शिडं?"
"हो, चालतील. "
असं आम्ही साहित्य गोळा करत गेलो.
मला वाटतं, आम्हांला एक मोठा फायदा मिळाला.
यापूर्वी कोणालाच कल्पना नव्हती, की
स्त्रियांचा चमू
पृथ्वीप्रदक्षिणा कशा पद्धतीने करेल.
त्यामुळे आम्ही जे केलं, ते योग्यच ठरलं.
आणि त्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं गेलं.
फक्त स्त्रियाच नव्हेत,
पुरुषही, ज्यांना याआधी सांगितलं गेलं होतं,
"अमुक गोष्ट करू नकोस,
कारण तुला ती तितकीशी जमणार नाही --
तुझं लिंग, वर्ण, जात किंवा
असलंच काहीतरी योग्य नाही म्हणून."
मेडन बोट हा एक ध्यास बनला.
त्यासाठी पैसे जमवणं फार कठीण होतं.
शेकडो संस्थांनी नकार दिला.
त्या म्हणाल्या,
"हे तुम्ही करू शकणार नाही."
या प्रयत्नात आमचं मरण ओढवेल,
असं लोकांना वाटत होतं.
खरोखरच लोक माझ्याजवळ येऊन म्हणत,
"यात तुमचा जीव जाईल."
मला वाटे, "तो माझा प्रश्न आहे.
तुमचा नव्हे."
शेवटी, जॉर्डनचे राजे हुसेन
यांनी आर्थिक साहाय्य केलं.
ही नवलाईची गोष्ट होती.
त्यांनी काळाच्या पुढे जाऊन,
समानतेला पाठिंबा दिला.
शांती आणि समानतेचा संदेश घेऊन
आम्ही जगपर्यटन केलं.
एखादा संदेश घेऊन शर्यतीत उतरलेली
ही आमची एकमेव बोट होती.
व्हिटब्रेड शर्यतीतल्या
दोन टप्प्यांत आम्ही जिंकलो,
सर्वात कठीण टप्प्यांमधले हे दोन.
आणि संपूर्ण शर्यतीत दुसरा क्रमांक.
१९७७ पासूनच्या ब्रिटिश इतिहासातला
हा विक्रम अजून अबाधित आहे.
या विजयामुळे अनेकांचा जळफळाट झाला.
त्या वेळी आम्ही काय केलं,
हे आम्हांला समजलं नव्हतं.
आम्ही अंतिम रेषा ओलांडली.
शर्यतीचा शेवट अविश्वसनीय झाला.
सोलेन्ट सामुद्रधुनीमधून
आमच्याबरोबर सहाशे बोटी येत होत्या.
आम्ही बंदरात येतेवेळी ओशियन व्हिलेज मध्ये
५० हजार लोक "मेडन, मेडन" चा घोष करत होते.
त्यावेळी समजलं, की
आम्ही आमचं ध्येय पूर्ण केलं आहे.
आपली कामगिरी चांगली झाली असेल,
अशी आम्हांला आशा होती,
पण आमच्यामुळे किती स्त्रियांची आयुष्यं
बदलली असतील याची कल्पना नव्हती.
दक्षिण समुद्र हा माझा आवडता समुद्र आहे.
समुद्राला व्यक्तिमत्व असतं.
उत्तर अटलांटिक समुद्र
हा उत्साही समुद्र आहे.
आनंदी, तत्पर आणि जोरकस,
हा धमाल समुद्र आहे.
दक्षिण समुद्र हा अत्यंत गंभीर समुद्र आहे.
तिथे पोहोचल्यावर लगेच समजतं, की
आपण दक्षिण समुद्रात प्रवेश केला,
त्या अक्षांश रेखांशावर आलो.
तिथे पोहोचताच
लाटा येऊ लागतात,
त्यांच्यावर पांढरा फेस दिसू लागतो.
सगळीकडे धुरकट दिसू लागतं.
काही कळेनासं होतं.
फक्त आपण कोण आहोत,
काय करतो आहोत, इतकंच समजतं.
भोवताली निसर्गाचं प्रचंड स्वरूप दिसतं.
सर्वत्र रिकामं दिसतं.
किती प्रचंड, किती रिकामा.
बोटीभोवती समुद्रपक्षी
घिरट्या घालताना दिसतात.
त्यांच्या क्षेत्रातून बाहेर पडायला
सुमारे चार दिवस लागतात.
त्यामुळे तेच पक्षी चार दिवस दिसत राहतात.
त्यांनाही आपल्याला पाहून नवल वाटतं.
त्यामुळे शिडावरून येणाऱ्या
वाऱ्यासोबत भराऱ्या मारत
ते बोटीच्या मागेमागे राहतात.
त्यामुळे मागे कोणीतरी आहे असा भास होऊन
आपण मागे वळतो.
तर काय, तो समुद्रपक्षी
आपल्याला पाहत असतो.
शर्यतीच्या शेवटी आम्ही मेडन विकली.
आमच्याजवळ पैसे नव्हते.
पाच वर्षांपूर्वी आम्हांला ती परत मिळाली.
त्याचवेळी एका दिग्दर्शकाने ठरवलं, की
मेडनबद्दल माहितीपट करायचा.
आम्हांला मेडन सापडली.
ती धडाक्याने परत आली.
तिने आठवणी परत आणल्या,
गेल्या काही वर्षांतल्या.
आपल्या इच्छेप्रमाणे जगावं
आणि जगाचा एक भाग व्हावं, याची आठवण.
आयुष्यात मला जे काही महत्त्वाचं वाटतं,
ते सर्व मेडनमुळे मिळालं आहे.
पुन्हा एकदा आम्ही तिला जीवदान दिलं.
जनता मदतफंड उभा केला.
आफ्रिकेतल्या सेयशल्स मधून तिला सोडवलं.
राजे हुसेन यांची राजकन्या हाया हिने
मेडनला इंग्लडला परत आणण्याचा
आणि तिच्या डागडुजीचा खर्च उचलला.
मूळ चमूतील सर्व खलाशी यात सहभागी झाले.
आम्ही जुना चमू परत उभा केला.
आणि मग विचार केला,
"आता पुढे मेडनचं काय करायचं?"
यावेळी माझ्या मनात
भूतकाळातली प्रत्येक गोष्ट उभी राहिली.
प्रत्येक प्रकल्प, मनातली प्रत्येक भावना,
प्रत्येक ध्यास, प्रत्येक लढा, झगडा.
म्हणून मी ठरवलं, की
मेडनने हा लढा पुढे सुरु ठेवायला हवा.
पुढच्या पिढीसाठी.
आता मेडन पाच वर्षांची जागतिक सफर करत आहे.
जगभरातल्या हजारो मुलींशी
आम्ही संवाद साधत आहोत.
मुलींना शिक्षणाकडे वळवणाऱ्या
सामाजिक उपक्रमांना साहाय्य करत आहोत.
शिक्षण म्हणजे केवळ वर्गात बसणं नव्हे.
तर त्यांना चुकीच्या कल्पना दाखवून देणं.
तुम्ही असंच दिसलं पाहिजे, हे चुकीचं आहे.
तुमच्या भावना अशाच असल्या पाहिजेत,
तुम्ही असंच वागलं पाहिजे, हे चूक.
तुम्ही यशस्वी होऊ शकता.
स्वप्नं पूर्ण करू शकता.
त्यासाठी लढा देऊ शकता.
आयुष्य अ पासून ब पर्यंत जात नसतं.
ते गुंतागुंतीचं असतं.
माझ्या आयुष्यात सुरुवातीपासून
शेवटपर्यंत गुंतागुंत होती.
पण त्यातूनच मी इथवर पोहोचले.
आमचं आणि मेडनचं भविष्य उज्जवल आहे.
माझ्यासाठी,
हे एक वर्तुळ पूर्ण करण्यासारखं आहे.
मेडनबरोबरचं वर्तुळ पूर्ण करणं.
आणि तिच्या साहाय्याने मुलींना सांगणं,
फक्त एका व्यक्तीचा
तुमच्यावर विश्वास असेल, तर
काहीही साध्य करता येतं.