मला आठवतंय, मी अकरा वर्षांची असताना एके दिवशी सकाळी मला एका खुशखबरीने जाग आली होती. माझे वडील त्यांच्या छोट्या करड्या रेडिओवर बीबीसीच्या बातम्या ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हास्य होतं. हे एक नवलच होतं. कारण बातम्या ऐकून ते नेहमी उदास होत असत. "तालिबान निघून गेले" ते ओरडले. मला याचा अर्थ समजला नाही. पण माझे वडील खूप खूष दिसत होते. "आता तुला खऱ्या शाळेत जाता येईल." ते म्हणाले. ती सकाळ मी कधीच विसरणार नाही. खरी शाळा. मी सहा वर्षांची होते तेव्हा तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि मुलींचं शिक्षण बेकायदेशीर ठरवलं. पुढची पाच वर्षं मी मुलांसारखे कपडे घालीत असे. माझ्या मोठ्या बहिणीला एकटीने हिंडायला बंदी होती. म्हणून, तिच्यासोबत एका छुप्या शाळेत जाण्यासाठी. आम्हा दोघींना शिकण्याचा तो एकच मार्ग होता. दर दिवशी आम्ही वेगळ्या रस्त्याने जायचो. कुणाला संशय येऊ नये म्हणून. आम्ही आमची पुस्तकं पिशवीत लपवून सहज बाजारात गेल्यासारख्या जायचो. ही शाळा एका घरात होती. आम्ही शंभरावर मुलं एका छोट्या खोलीत जमायचो. हिवाळ्यात ते उबदार वाटे. पण उन्हाळ्यात अतिशय उकडायचं. आम्ही जाणूनबुजून जीव धोक्यात घालीत होतो. शिक्षक, विद्यार्थी आणि आमचे पालक, सर्वच. अनेकदा शाळा अचानक आठवडाभर बंद ठेवली जाई. तालिबानला संशय आला म्हणून. आम्हाला नेहमी वाटे, त्यांना आपल्याबद्दल काय माहित असेल? आपला पाठलाग होत असेल का? आपण कुठे राहतो ते त्यांना ठाऊक असेल का? आम्हाला भीती वाटे. पण तरीही आम्हाला शाळेत जायचं होतं. माझं भाग्य मोठं, म्हणून मी अशा एका कुटुंबात लहानाची मोठी झाले की जिथे शिक्षणाला मान होता आणि मुली ही मौल्यवान ठेव होती. माझे आजोबा त्यांच्या काळातले एक असामान्य पुरुष होते. अफगाणिस्तानाच्या एका दुर्गम भागातल्या या सर्वस्वी बेलगाम माणसाने, आग्रह धरला, त्यांच्या मुलीला, म्हणजे माझ्या आईला, शाळेत घालण्याचा. आणि त्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. पण माझी आई शिकली, ती शिक्षिका झाली. ही पहा. दोन वर्षांपूर्वी ती निवृत्त झाली, ती केवळ आमच्या घराचं रूपांतर, आजूबाजूच्या मुली आणि स्त्रियांच्या शाळेत करण्यासाठीच. आणि माझे वडील - हे पहा - त्यांच्या घराण्यातले शिकणारे ते पहिलेच. तेव्हा त्यांची मुलं आणि मुलीसुद्धा शिकणार यात शंकाच नव्हती. तालिबानसारखे धोके असूनही. त्यांच्या मते, आपल्या मुलांना शिक्षण न देणं हा जास्त मोठा धोका होता. मला आठवतंय, तालिबानच्या काळात काही वेळा आपल्या आयुष्याकडे पाहून मी खूप हताश होई. तसंच सततची भीती, आणि समोर भविष्य दिसत नसल्यामुळेही. मला (शिक्षण) सोडून द्यावंसं वाटे. पण माझे वडील, ते म्हणत, "ऐक, माझ्या मुली, आयुष्यात आपल्या मालकीचं जे काही असतं, ते सगळं गमावलं जाऊ शकतं. आपले पैसे चोरले जाऊ शकतात. लढाईत आपल्याला आपल्या घरातून हाकललं जाऊ शकतं. पण कायम आपल्यासोबत राहणारी एकमेव गोष्ट म्हणजे ही इथे आहे ती. आणि आम्हाला जर तुझ्या शाळेची फी भरण्याकरता आमचं रक्त विकावं लागणार असेल, तर आम्ही ते विकू. तर, अजूनही तुला (शिक्षण) सुरू ठेवावसं वाटत नाही काय?” आज मी बावीस वर्षांची आहे. मी लहानाची मोठी झाले, ती दशकभर चाललेल्या युद्धात नाश पावलेल्या एका देशात. माझ्या वयाच्या सहा टक्क्याहून कमी स्त्रियांनी माध्यमिक शाळा पार केली आहे. माझ्या कुटुंबाने जर माझ्या शिक्षणाचा निर्धार केला नसता, तर मीही त्या (स्त्रियां)तलीच एक ठरले असते. त्याऐवजी, आज मी इथे मिडलबरी कॉलेजची पदवीधर म्हणून अभिमानाने उभी आहे. (टाळ्या) मी जेव्हा अफगाणिस्तानात परतले, तेव्हा मुलींना शिकवल्याबद्दल घरातून हद्दपार झालेल्या माझ्या आजोबांनी माझं सर्वप्रथम अभिनंदन केलं. ते बढाई मारतात, ती केवळ माझ्या पदवीची नव्हे, तर (पदवी घेणारी) मी पहिलीच स्त्री म्हणूनही. आणि मी पहिलीच स्त्री आहे, त्यांना काबूलच्या रस्त्यांतून स्वतः गाडी चालवून घेऊन जाणारी, म्हणून. (टाळ्या) माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास आहे. मी मोठी स्वप्नं पाहते, पण माझ्या घरच्यांची स्वप्नं त्याहूनही मोठी आहेत. म्हणून मी १० x १० ची वैश्विक राजदूत झाले. १० x १० ही स्त्रीशिक्षणाची एक जागतिक मोहीम आहे. तशीच मी SOLA ची सहसंस्थापिका झाले. SOLA ही अफ़गाणिस्तानातली पहिलीच आणि कदाचित एकमेव मुलींची निवासी शाळा आहे. अशा एका देशातली, जिथे अजूनही मुलींनी शाळेत जाणं धोक्याचं आहे. कौतुकाची गोष्ट अशी, की माझ्या शाळेतल्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थिनी मला सुसंधी पटकावताना दिसताहेत. आणि त्यांचे पालक आणि जन्मदाते, माझ्या घरच्यांप्रमाणेच, त्यांची पाठराखण करताना दिसताहेत, भयानक विरोध पत्करून आणि त्याला तोंड देऊन. अहमद प्रमाणे. हे काही त्याचं खरं नाव नव्हे. आणि मी तुम्हाला त्याचा चेहरा दाखवू शकत नाही. पण अहमद माझ्या एका विद्यार्थिनीचा पिता. महिन्याभरापूर्वी, तो आणि त्याची मुलगी SOLA हून आपल्या गावी जायला निघाले होते. आणि ते रस्त्यावरच्या बॉम्बस्फोटात अक्षरशः मरता मरता वाचले. केवळ काही मिनिटांच्या फरकाने. तो घरी पोहोचताच फोन वाजला. त्याला धमकावण्यात आलं. पुन्हा जर मुलीला शाळेत पाठवलंस, तर आम्ही पुन्हा प्रयत्न करू म्हणून. "हवं तर आत्ताच मारा मला," तो म्हणाला, "पण तुमच्या जुन्या आणि मागासलेल्या कल्पनांपायी मी माझ्या मुलीचं भविष्य नष्ट करणार नाही." मला जी गोष्ट अफगाणिस्तानबद्दल जाणवली आहे, आणि जी पाश्चात्यांकडून नेहमी डावलली जाते ती अशी, की आमच्यापैकी बहुतेक यशस्वी मुलींच्या पाठीशी एक पिता असतो, जो त्याच्या मुलीची योग्यता जाणतो आणि तिचं यश हेच आपलं यश मानतो. (मला) असं म्हणायचं नाही, की आमच्या माता आमच्या यशाच्या शिल्पकार नसतात. खरं तर, बरेचदा त्याच पुढाकार घेऊन मुलींना शिकवण्याचा आग्रह धरतात. पण अफगाणिस्तानासारख्या समाजाच्या संदर्भात, आम्हाला पुरुषांचा पाठिंबा आवश्यक असतो. तालिबानच्या राजवटीत, शाळेत जाणाऱ्या मुलींची संख्या शेकड्यात होती. आठवतं का, ते बेकायदेशीर होतं. पण आज, अफगाणिस्तानातल्या तीस लाखावर मुली शाळेत शिकताहेत. (टाळ्या) अमेरिकेतून अफगाणिस्तान खूप वेगळा दिसतो. मला वाटतं, अमेरिकेतून पाहताना हे बदल क्षीण दिसतात. अमेरिकन फौजा परतल्यानंतर हे बदल फार टिकणार नाहीत, अशी भीती वाटते. पण मी जेव्हा अफगाणिस्तानात परतते, माझ्या शाळेतल्या विद्यार्थिनी पाहते, त्यांच्या पाठीशी उभे असणारे त्यांचे पालक पाहते, तेव्हा मला उज्ज्वल भविष्य दिसतं, आणि कायम टिकणारे बदल दिसतात. माझ्यासाठी, अफगाणिस्तान देश आहे आशेचा आणि अमर्याद शक्यतांचा, आणि दरदिवशी SOLAच्या मुली मला याची आठवण करून देतात. माझ्यासारख्याच, त्याही मोठी स्वप्नं पाहताहेत. धन्यवाद. (टाळ्या)