हॅलो. माझं नाव सिमोन. तुम्ही ऐकलं असेल, की व्यासपीठावर वाटणारी भीती कमी होण्यासाठी, समोरचे लोक विवस्त्र बसले आहेत, अशी कल्पना करावी. त्यामुळे तुमचा धीर वाढू शकतो. पण मला वाटलं, की आज, २०१८ साली विवस्त्र प्रेक्षकांची कल्पना करणं विचित्र आणि चुकीचं ठरेल. आपण या असल्या गोष्टी मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. आता व्यासपीठावरच्या भीतीसाठी आपल्याला एक नवीन उपाय शोधला पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं, की तुम्ही जसे माझ्याकडे पाहता आहात, तसंच मला तुमच्याकडे पाहता आलं, तर फिटंफाट होईल. म्हणजे माझ्याकडेही पुष्कळ डोळे असले, तर मग मला तितकीशी भीती वाटणार नाही. म्हणून मग आजच्या व्याख्यानासाठी मी एक शर्ट तयार केला. (खुळखुळ आवाज ) (हशा) हे आहेत हलणारे डोळे. हा शर्ट बनवायला मला १४ तास आणि २२७ डोळे लागले. तुम्ही जसे माझ्याकडे पाहता आहात, तसंच मला तुमच्याकडे पाहता यावं, हे खरं तर, हा शर्ट बनवण्यामागचं फक्त अर्धंच कारण आहे. आणि असं करता यावं, हे उरलेलं अर्धं कारण. (खुळखुळ आवाज ) (हशा) मी अशा अनेक गोष्टी करते. मला एखादा प्रश्न पडतो आणि मग मी त्यावर काहीतरी उपाय शोधून काढते. उदाहरणार्थ, दात घासणे. हे काम आपल्याला सर्वांना करावं लागतं, पण ते कंटाळवाणं आहे. कुणालाच ते आवडत नाही. आता इथे प्रेक्षकांत कोणी सात वर्षांची मुलं असतील, तर ती नक्की म्हणतील, "हो हो, अगदी खरं." पण हे काम एखाद्या यंत्राने केलं तर? (हशा) मी या यंत्राला नाव ठेवलं आहे.. टूथब्रश हेल्मेट. (हशा) (यांत्रिक हाताचा आवाज) (हशा) (टाळ्या) माझ्या या टूथब्रश हेल्मेटची शिफारस दहापैकी शून्य दंतवैद्यांनी केली आहे. या यंत्राने दंतवैद्यकशास्त्रात कसलीही क्रांती घडवली नाही. पण त्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. हे टूथब्रश हेल्मेट बनवण्याचं काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झालं. हे यंत्र तयार झाल्यानंतर मी माझ्या दिवाणखान्यात गेले. कॅमेरा सुरु केला, आणि या यंत्राचं काम दाखवणारी सात सेकंदांची फिल्म बनवली. आणि आजच्या युगातली परीकथा अशी असते.. एखादी मुलगी इंटरनेटवर काहीतरी प्रसिद्ध करते. ते जगभर पसरतं. मग प्रतिसादाच्या जागेत हजारो पुरुष प्रकट होतात, आणि तिला लग्नाची मागणी घालतात. (हशा) पण तिकडे लक्ष न देता ती एक YouTube चॅनल काढते, आणि यंत्रं बनवत राहते. त्यावेळेपासून मी इंटरनेटवर स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. मी आहे कुचकामी यंत्र संशोधक. आपण सर्व जाणताच, की आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अगदी छोटं क्षेत्र निवडणं. (हशा) (टाळ्या) तर, मी माझ्या यंत्रांबद्दलचा YouTube चॅनल चालवते. ड्रोन वापरून मी केस कापते. (ड्रोनचा आवाज) (हशा) (ड्रोन पडतो.) (हशा) (ड्रोनचा आवाज) (हशा) (टाळ्या) हे यंत्र मला सकाळी उठवतं. (गजर) (हशा) (व्हिडीओ) आ! हे यंत्र भाजी चिरायला मदत करतं. (सुऱ्यांची पाती भाजी चिरतात.) मी अभियंती नाही. मी विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षण घेतलं नाही. पण शाळेत असताना मी खूप महत्त्वाकांक्षी होते. माध्यमिक शाळेत मी सतत ए ग्रेड मिळवत असे. वर्गात मी पहिल्या क्रमांकावर होते. पण याची दुसरी बाजू अशी, की या यशाबद्दलची पराकोटीची चिंता मला सतत भेडसावत असे. त्या सुमाराला मी माझ्या भावाला लिहिलेली ही ईमेल पहा. "हे सांगणं मला किती कठीण जातंय, याची तुला कल्पना येणार नाही. ही कबुली देताना मला खूप शरम वाटते आहे. मी मूर्ख आहे, असं लोकांना वाटायला नको. आता मला रडू येतंय. छे!" नाही, मी काही घराला चुकून आग वगैरे लावली नव्हती. ज्या गोष्टीविषयी मी इतकं अस्वस्थ होऊन ईमेल मध्ये लिहिलं ती गोष्ट होती, गणिताच्या परीक्षेत मिळालेली बी ग्रेड. तो काळ आणि हा काळ... मधल्या काळात नक्कीच काहीतरी घडलं असलं पाहिजे. (हशा) त्यापैकी एक.. पौगंडावस्था. (हशा) खरंच, सुंदर काळ होता तो. आणि त्याच काळात मला यंत्रं बनवणंही आवडू लागलं. हार्डवेअरबद्दल जास्त शिकावंसं वाटू लागलं. पण स्वतःच स्वतःला हार्डवेअरबद्दल शिकवणं, आणि त्यापासून यंत्रं बनवणं हे अतिशय कठीण आहे. त्यात अपयश येण्याची शक्यता आहे. तसंच, त्यामुळे आपण मूर्ख आहोत असं वाटणंही साहजिक आहे. याच गोष्टीची भीती मला सर्वात जास्त वाटत होती. म्हणून मग शंभर टक्के यश मिळेल अशी योजना मी आखली. या योजनेत अयशस्वी होणं केवळ अशक्य होतं. ही योजना अशी, की नीट चालणाऱ्या यंत्रांऐवजी, कुचकामी यंत्रं बनवायची. त्यावेळी माझ्या लक्षात आलं नव्हतं,की कुचकामी गोष्टी बनवायलासुद्धा अक्कल लागते. हार्डवेअरबद्दल शिकताना, आयुष्यात पहिल्यांदाच, मला यशाची चिंता वाटेनाशी झाली. स्वतःवर लादलेलं अपेक्षांचं दडपण दूर केल्यावर त्याची जागा उत्साहाने घेतली. त्यामुळे तो खेळ वाटू लागला. एक संशोधक म्हणून, लोकांना कठीण वाटणाऱ्या गोष्टींमध्ये मला रस वाटतो. मग त्या गोष्टी छोट्या असोत, मोठ्या असोत, किंवा अधल्यामधल्या. TED व्याख्यान देताना काही नवीन प्रकारच्या समस्या उभ्या राहतात. त्या मी सोडवू शकते. समस्या नीट समजून घेणं, ही कुचकामी यंत्र बनवण्याच्या प्रक्रियेतली पहिली पायरी आहे. हे व्याख्यान देताना येणाऱ्या समस्यांचा विचार मी इथे येण्यापूर्वी केला. काय बोलायचं ते मी विसरेन. लोक हसणार नाहीत. म्हणजे तुम्ही. किंवा त्याहून वाईट, तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसाल. आता इथे हसायला हरकत नाही. धन्यवाद. (हशा) किंवा, मला खूप भीती वाटेल. माझे हात थरथर कापतील. ही मला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. किंवा माझी पॅन्ट व्याख्यानभर उघडीच राहील. आणि हे मला कळणार नाही, पण तुम्हाला दिसेल. पण पॅन्ट बंद आहे, तेव्हा ती भीती नाही. पण हात थरथरण्याची भीती मला खूप अस्वस्थ करते. मला आठवतं, लहानपणी शाळेत वर्गासमोर बोलताना मी माझे मुद्दे एका कागदावर लिहीत असे, आणि त्या कागदामागे एक वही धरत असे. थरथरणारा कागद कोणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून. मी पुष्कळ व्याख्यानं देते. मला ठाऊक आहे, इथले निम्मे प्रेक्षक म्हणत असतील, "निरुपयोगी यंत्रं मजेशीर असतील, पण हा व्यवसाय कसा होऊ शकतो?" व्याख्यानं देणं हा त्याचा एक भाग आहे. व्यासपीठावर आयोजक एखादा पेला भरून पाणी ठेवतात. तहान लागली तर पिण्यासाठी. मला नेहमीच ते पाणी प्यायची जोरदार इच्छा होते. पण तो पेला उचलायची हिम्मत होत नाही. लोकांना माझे थरथरणारे हात दिसतील, अशी भीती वाटते. मग, पाण्याचा पेला उचलून देणारं यंत्र बनवलं तर? हलणाऱ्या डोळ्यांचा शर्ट घातलेली घाबरट मुलगी ते यंत्र विकत घेईल. आता हा शर्ट काढते, कारण मला तुम्हांला काहीतरी दाखवायचं आहे. (डोळ्यांचा खुळखुळ आवाज) ओह (खुळखुळ) (हशा) मला या यंत्रासाठी अजून नाव सुचलेलं नाही. "मस्तक कक्षा यंत्र" वगैरे काहीतरी म्हणू. कारण याचं कडं आपल्या डोक्याभोवती फिरतं. त्यावर आपण काहीही ठेवू शकतो. यावर कॅमेरा ठेवला, तर आपल्या संपूर्ण डोक्याची छायाचित्रं मिळतील. या यंत्राचे अनेक उपयोग आहेत. (हशा) उदाहरणार्थ, आपण यावर खाद्यपदार्थ ठेवू शकतो. आपल्या इच्छेनुसार. माझ्याकडे पॉपकॉर्न आहेत. त्यातले थोडे मी या यंत्रावर ठेवले. आणि मग.. विज्ञानासाठी थोडासा त्याग केला. यापैकी काही पॉपकॉर्न जमिनीवर सांडले. आता कक्षेतून भ्रमण पूर्ण करू. (यंत्राचा आवाज) (हशा) आता एक छोटासा हात पुढे येईल. तो योग्य उंचीवर आणू. फक्त खांदे उडवले, की झालं. (हशा) (टाळ्या) छोटासा हात.. (हात जोरात ढकलतो.) (हशा) (टाळ्या) मी मायक्रोफोन पाडला वाटतं. पण काही हरकत नाही. ठीक आहे. आता मला हे पॉपकॉर्न चावून खाल्ले पाहिजेत. तुम्ही आणखी थोडा वेळ टाळ्या वाजवत राहाल का? (टाळ्या) तर ही आहे माझी खाजगी सूर्यमाला. या शतकात जन्मल्यामुळे, मी आत्मकेंद्रित आहे. सगळं माझ्याभोवती फिरलं पाहिजे. (हशा) आता पुन्हा पाण्याच्या पेल्याकडे वळू. या यंत्रावर अजून.. खरं सांगते.. या पेल्यात पाणी नाहीये. माफ करा. पण या यंत्रावर मला अजून काम केलं पाहिजे. पेला उचलून कड्यावर ठेवता आला पाहिजे. आता माझे हात जरासे थरथरले, तरी ते दिसणार नाहीत. कारण या अद्भुत यंत्राने तुम्हांला मंत्रमुग्ध केलं आहे. माझी काळजी मिटली. ठीक आहे. (यंत्राचा आवाज) (गाते) अरेरे, हे तर अडकलं. या यंत्रालाही कधीकधी व्यासपीठावर भीती वाटते. मग ते जरासं अडकतं. अगदी माणसांसारखं. थांबा.. थोडं मागे जाऊ. आणि मग.. (पेला पडतो) (हशा) आजच्या काळात जन्माला येणं किती भाग्याचं आहे. (हशा) (टाळ्या) माझी यंत्रं म्हणजे जणु आंगिक विनोदाचा अभियांत्रिकी अवतार. पण यातून मला काहीतरी महत्त्वाचं सापडलं. आनंद आणि विनम्रपणा. बरेचदा, अभियांत्रिकी जगात या गोष्टी हरवून जातात. यातून मला हार्डवेअरबद्दल बरंच काही शिकता आलं. यशाची चिंता आड आली नाही. मला नेहमी विचारलं जातं, "काहीतरी उपयोगाचं करणार आहेस का कधी?" कोण जाणे, करेनही कधीतरी. माझ्या दृष्टीने, हेही उपयुक्तच आहे. कारण हे काम मी स्वतःहून सुरु केलं. योजना आखून करता येणार नाही असं काम आहे हे. हा व्यवसाय.. (टाळ्या) आखणी करून सुरु करता आला नसता. मी जे काही केलं ते उत्साहाने केलं, म्हणून हे सगळं घडलं. माझा उत्साह मी इतरांना वाटला. मला वाटतं, हेच कुचकामी यंत्रं बनवण्यातलं खरं सौंदर्य. इथे आपण कबुली देतो, की आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठाऊक नाहीत. त्यामुळे, आपल्याला जगातलं सगळं ठाऊक आहे, असं सांगणारा तो आपल्याच डोक्यातला आवाज गप्प बसतो. टूथब्रश हेल्मेट हे उत्तर नसेल, पण आपण निदान प्रश्न तरी विचारला! धन्यवाद. (टाळ्या)