टेड हे मोठ्या गोष्टींसाठी आहे,
हे मला ठाऊक आहे.
पण मी तुम्हाला
एका अगदी छोट्या गोष्टीबद्दल सांगणार आहे.
इतकी छोटी, की तिच्यासाठी एकच शब्द पुरतो.
तो शब्द आहे, वेगळी.
अगदी योग्य शब्द आहे.
म्हणजे, एखादी व्यक्ती,
जी सर्वांसारखी होऊच शकत नाही.
किंवा, सर्वांच्यात वेगळी ठरते.
किंवा, अशी व्यक्ती, जी नव्या वातावरणाशी
योग्य रीतीने जुळवून घेऊ शकत नाही.
माझ्यावर वेगळेपणाचा जणु शिक्काच आहे.
मी या सभागृहातल्या
इतर वेगळ्यांसाठी इथे आले आहे.
कारण मी एकटीच वेगळी,
असं कधीच होत नाही.
मी वेगळेपणाची गोष्ट सांगणार आहे.
मी तिशीत पाऊल टाकलं तेव्हा,
लेखिका होण्याचं स्वप्न
माझ्या दारी चालत आलं.
खरं तर, ते माझ्या टपालातून आलं.
एका पत्राच्या रूपात.
माझ्या एका लघुकथेला मोठं बक्षीस मिळाल्याचं
त्यात लिहिलं होतं.
ती लघुकथा माझ्याच आयुष्याबद्दल होती.
माझ्या स्पर्धांतून पोहण्याबद्दल.
वाईट घरगुती आयुष्याबद्दल.
आणि थोडीशी,
दुःखामुळे आणि आपलं माणूस गमावल्यामुळे
कशी वेड लागायची वेळ येऊ शकते, त्याबद्दल.
मोठमोठे प्रकाशक, एजंट्स आणि लेखक
यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कची सफर,
असं ते बक्षीस होतं.
म्हणजे होतकरू लेखिकेचं स्वप्नच, हो ना?
ते पत्र मिळाल्याच्या दिवशी मी काय केलं,
ठाऊक आहे तुम्हाला?
मी अशी आहे ना,
ते पत्र मी स्वयंपाकघरातल्या टेबलावर ठेवलं
स्वतःसाठी एक मोठा ग्लासभरून वोडका ओतली,
सोबत बर्फ आणि लिंबू,
आणि दिवसभर नुसत्या अंतर्वस्त्रांत
तिथेच बसले.
त्या पत्राकडे बघत.
आजवर आयुष्यात मी किती प्रकारचे
घोळ घातले आहेत, त्याचा विचार करीत.
न्यूयॉर्कमध्ये जाऊन,
लेखिका असल्याची बतावणी करायला
मी होते तरी कोण?
कोण होते मी?
तुम्हांला सांगते,
मी होते "वेगळी."
कित्येक मुलांसारखी,
कौटुंबिक अत्याचारापासून
कसाबसा जीव वाचवून निसटलेली.
अगदी वाईट प्रकारे विस्कटलेली
दोन लग्नें गाठीला होती.
एकदाच नव्हे, तर दोनदा
मला कॉलेजातून डच्चू मिळाला होता.
मला वाटतं, तिसऱ्यांदा देखील,
पण ते मी तुम्हाला सांगणार नाही.
(हशा)
मी एकदा ड्रग्स सोडण्याचा
प्रयत्नही केला होता.
आणि दोनदा तुरुंगातही पाहुणचार झोडला होता.
म्हणजे मी इथे आले ते बरोबरच आहे.
(हशा)
पण माझ्या वेगळेपणाचं खरं कारण हे,
की माझी मुलगी जन्मल्या दिवशीच
मरण पावली होती,
आणि हे दुःख घेऊन कसं जगायचं
ते मला कळत नव्हतं.
तिच्या मृत्यूनंतर मी बराच काळ
घरहीन अवस्थेत काढला.
मी एका पुलाखाली राहत होते.
तीव्र दुःखामुळे आणि तिला गमावल्यामुळे
भ्रमिष्ट झालेल्या अवस्थेत.
आयुष्यात काहींना या अवस्थेचा अनुभव येतो.
कदाचित पुष्कळ जगलात,
तर तुम्हांलाही तो अनुभव येईल.
घरहीन लोक हे "वेगळ्या" लोकांमधले
शूर लोक असतात.
कारण त्यांचं आयुष्य
आपल्यासारखंच सुरु होतं.
मी कुठल्याच साच्यात बसत नव्हते.
मुलगी, बायको, आई, विदुषी.
आणि माझं लेखिका होण्याचं स्वप्न म्हणजे
जणु माझ्या घशाशी दाटलेला हुंदका होता.
इतकं असूनही मी विमानात बसले
आणि न्यूयॉर्कला गेले.
लेखकांच्या गावी.
माझासारख्या "वेगळ्यांनो",
तुमचे चेहरे उजळलेले दिसताहेत.
मी कुठेही तुम्हाला ओळखेन.
तसं सुरुवातीला ते आवडण्यासारखंच होतं.
कोणत्या तीन प्रसिद्ध लेखकांना भेटायचं,
ते आपण ठरवायचं.
मग ते लोक जाऊन त्या लेखकांना शोधून आणीत.
ग्रामरसी पार्क हॉटेल मध्ये राहायचं.
रात्री उशिरा स्कॉच प्यायची.
तीही एकदम सही, स्मार्ट भपकेबाज लोकांबरोबर.
आणि आपणही सही, स्मार्ट आणि भपकेबाज आहोत
असं दाखवायचं.
तिथे पुष्कळ लेखक, संपादक आणि
एजन्ट्स भेटत.
खूप म्हणजे खूपच भारी लंच आणि डिनर्स असत.
किती भारी ते विचारा.
प्रेक्षक : किती भारी?
मी कबुली देते: मी तीन नॅपकिन्स चोरले.
(हशा)
तीन रेस्टोरंटस मधून.
आणि एक मेन्यू कार्ड पॅंटमधे लपवून आणलं.
(हशा)
मला आठवण म्हणून घरी न्यायला
काहीतरी हवं होतं.
हे खरंच घडलं यावर
विश्वास बसण्यासाठी.
मला कॅरोल मेसो, लिन टिलमन
आणि पेगी फेलन
या तीन लेखिकांना भेटायचं होतं
या सर्वाधिक खपाच्या,
प्रसिद्ध लेखिका नव्हत्या.
पण माझ्या नजरेत त्या महान लेखिका होत्या.
कॅरोल मेसो ने लिहिलेलं पुस्तक
माझ्या कलेसाठी बायबल ठरलं.
लिन टिलमनने मला विश्वास दिला,
की माझ्या गोष्टींना या जगात
जागा मिळू शकेल.
पेगी फेलन ने आठवण करून दिली,
की माझ्या रूपापेक्षा
माझा मेंदू जास्त महत्वाचा आहे.
त्या लेखनाच्या मुख्य प्रवाहातल्या
लेखिका नव्हत्या.
पण आपल्या लिखाणाने
त्या मुख्य प्रवाहात
मार्ग काटत होत्या.
नदीने मार्ग काटून
ग्रँड कॅनियन निर्माण झाली, तशा.
पन्नाशीपुढल्या त्या तीन लेखिकांच्या
भेटीमुळे, अत्यानंदाने माझा प्राण जाईल
असं वाटू लागलं.
कारण,
यापूर्वी कधीच मला इतका आनंद वाटला नव्हता.
अशा ठिकाणी मी कधीच गेले नव्हते.
माझी आई कधीच कॉलेजात गेली नव्हती.
त्या वेळेपर्यंत माझी प्रतिभा म्हणजे
जणु मृतावस्थेत जन्मलेलं अर्भक होतं.
तर न्यूयॉर्कमधल्या सुरुवातीच्या
काही रात्रींत, मला मरावंसं वाटे.
"हे किती सुंदर आहे. जगण्याचं सार्थक झालं.
आता मी मरायला तयार आहे."
त्यानंतर जे घडलं,
ते आपल्यापैकी काही समजू शकतील.
त्यांनी मला फरार, स्ट्राउस आणि जरू
यांच्या ऑफिसांत नेलं.
फरार, स्ट्राउस आणि जरू म्हणजे
माझ्या कल्पनेतले भव्यदिव्य प्रकाशक.
टी. एस. एलियट आणि फ्लॅनरी ओ'कॉनर
यांचे प्रकाशक.
त्यांच्या मुख्य संपादकांनी मला बसवून घेतलं
आणि ते माझ्याशी बराच वेळ बोलले.
माझ्या पोहण्याबद्दल मी एक पुस्तक लिहावं,
म्हणजे आठवणींचा संग्रह,
असा आग्रह करीत होते.
ते जितका वेळ माझ्याशी बोलत होते,
तितका सगळं वेळ मी मूर्खासारखी हसत
आणि मान डोलावत बसले होते.
हाताची घडी घालून.
माझ्या तोंडून एकही शब्द निघाला नाही.
शेवटी त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटलं.
पोहण्याच्या शिक्षकांसारखंच.
त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.
आणि काही पुस्तकं विनामूल्य दिली.
ते मला दारापर्यंत सोडायला आले.
त्यानंतर त्या लोकांनी मला
डब्ल्यू डब्ल्यू नॉर्टनच्या ऑफिसात नेलं.
मला खात्री वाटत होती, की
ते मला लगेच बाहेर नेऊन सोडतील.
डॉक मार्टेन चे बूट घातले, म्हणून.
पण तसं काही घडलं नाही.
नॉर्टनच्या ऑफिसात असं वाटलं, की
मी रात्रीच्या अंधारात हात उंचावून
आभाळातल्या चंद्राला स्पर्श करते आहे, आणि
चांदण्या ब्रह्मांडावर माझं नाव कोरताहेत.
ही गोष्ट मला अशी प्रचंड मोठी वाटत होती.
कळलं ना?
त्यांच्या मुख्य संपादिका
कॅरोल हूक स्मिथ,
जरा वाकल्या, आणि आपले तेजस्वी डोळे
माझ्यावर रोखून म्हणाल्या,
चल तर मग, ताबडतोब मला
काहीतरी लिखाण पाठवून दे.
इतकं झाल्यावर कोणीही,
विशेषतः टेड मधले लोक,
लगेच पोष्टात धावले असते ना?
पण पाकिटात काहीतरी घालून
त्याला स्टँम्प लावण्याची कल्पना करायलाच
मला एका दशकाहून जास्त वेळ लागला.
शेवटच्या रात्री,
मी नॅशनल पोएट्री क्लब मध्ये मी
एक मोठं साहित्यवाचन केलं.
ते संपताच
किडी, हॉयट आणि पिकार्ड या साहित्य
संस्थेच्या कॅथरीन किडी सरळ माझ्याजवळ आल्या
आणि त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केलं.
लगेच तिथल्या तिथे त्यांनी
माझं प्रतिनिधित्व करण्याची तयारी दाखविली.
माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.
तुम्हांला असा अनुभव आला आहे का?
मला वाटलं, आता मला रडू कोसळणार.
कारण, इतके सुरेख कपडे घातलेल्या लोकांच्या
त्या खोलीत हे घडत होतं.
मी फक्त इतकंच बोलू शकले:
"मी आत्ता काही सांगू शकत नाही.
मला विचार करावा लागेल. "
त्या म्हणाल्या, "ठीक आहे."
आणि निघून गेल्या.
इतके हात मला मदत करायला पुढे आले होते.
माझ्या घशातला तो हुंदका..
मी तुम्हांला माझ्यासारख्या लोकांबद्दल
काही सांगायचा प्रयत्न करते आहे.
आम्हां वेगळ्यांना कधी कळतच नाही,
कशाची आशा बाळगावी, कशाला होकार द्यावा.
किंवा एखादी महत्त्वाची गोष्टही
घेता येत नाही.
अगदी डोळ्यासमोर असली तरी.
आम्ही शरमेचं ओझं वाहात असतो.
आपल्याला चांगलं काही हवंसं वाटतं
याची शरम.
काही चांगली भावना जाणवते आहे, याची शरम.
आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या
लोकांच्यात मिसळायचा आपल्याला हक्क आहे,
या अविश्वसनीय गोष्टीबद्दलची शरम.
शक्य झालं असतं तर मी भूतकाळात जाऊन
स्वतःला सुधारलं असतं.
मग मी, मला मदत करणाऱ्या त्या
पन्नाशीपुढल्या स्त्रियांसारखीच झाले असते.
मी स्वतःला ध्येय ठेवायला शिकवलं असतं.
त्यासाठी उभं राहून,
ते मिळवायला शिकवलं असतं.
मी म्हणाले असते, "तू! हो तूच.
तूही या खोलीतलीच एक आहेस."
ते दैवी तेज आपल्या सर्वाना लाभलं आहे.
आणि एकमेकांशिवाय आपण कुणीच नाही आहोत.
मी ओरेगॉनला परत आले.
विमानातून झाडी आणि पाऊस पहात
मी "स्वतःची कीव करणे" या पेयाच्या
अनेक छोट्या बाटल्या ढोसल्या.
मी जर लेखिका असलेच, तर एक
"वेगळी" लेखिका असेन, असं मला वाटत होतं.
म्हणजे असं की,
मी ओरेगॉनला परत गेले
लिखाणाच्या कराराशिवाय,
एजन्ट न नेमता.
मनात आणि डोक्यात आठवणी भरून घेऊन.
इतक्या छान लेखिकांच्या
इतकं जवळ जाता आल्याच्या आठवणी.
आठवणी हे एकच बक्षीस मी स्वतःला घेऊ दिलं.
तरीही, घरी परतल्यावर अंधारात
पुन्हा अंतर्वस्त्रांत बसल्यावर
मला त्यांचे आवाज ऐकू येऊ लागले.
त्या म्हणाल्या, "कुणाचं ऐकून
तोंड बंद करू नकोस.
तुझी कहाणी सुद्धा बदलू नकोस.
तुझी कहाणी, जी फक्त तुलाच ठाऊक आहे,
तिला व्यक्त होऊ दे.
काहीवेळा कहाणी सांगितल्यामुळे
आपला प्राण वाचू शकतो."
आता पहा, मी पन्नाशीपुढची स्त्री आहे.
आणि मी एक लेखिका आहे.
आई आहे.
शिक्षिका आहे.
माझे आवडते विद्यार्थी कोण असतील, ओळखा.
ते पत्र आल्यादिवशी नसेल,
पण नंतर
मी माझ्या आठवणी लिहिल्या.
"क्रोनॉलॉजी ऑफ वॉटर"
किती वेळा मला चुकीच्या निर्णयांच्या
अवशेषांतून पुन्हा स्वतःला घडवावं लागलं,
त्याबद्दलच्या गोष्टी त्यात आहेत.
अपयश भासलं तरी त्यातून विचित्र प्रकारे
सुंदर भविष्याची वाट सापडली,
अशा गोष्टीही.
मी फक्त त्या गोष्टी व्यक्त केल्या.
अनेक समाजांत, आपल्या स्वप्नाचा
पाठपुरावा करा, असा समज असतो.
हा यशस्वी लोकांचा समज.
पण माझा जास्त विश्वास आहे,
तो त्याशेजारीच किंवा
त्याच्या मुळाशी असलेल्या
"वेगळ्यांच्या" समजावर.
तो समज असा:
अपयशाच्या क्षणी देखील
तुम्ही सुंदरच असता.
त्या वेळी ठाऊक नसलं,
तरी स्वतःला पुन्हा एकदा घडवणं
शक्य असतं.
सतत.
हेच तुमचं सौंदर्य.
तुम्ही दारुडे असाल,
अत्याचारातून वाचलेले असाल,
एकेकाळचे ठग असाल,
घरहीन असाल,
तुम्ही सगळे पैसे गमावले असतील,
किंवा नोकरी, किंवा नवरा,
किंवा बायको, किंवा,
सर्वात वाईट म्हणजे,
तुमचं मूल.
तुम्ही तुमच्या अपयशाच्या
अगदी मध्यभागी उभे असाल,
आणि तरीही, मी तुम्हांला इतकंच सांगेन,
की तुम्ही खूप सुंदर आहात.
तुमच्या कहाणीला व्यक्त होण्याचा हक्क आहे.
कारण तुम्ही आहात, एक दुर्मिळ
आणि जबरदस्त "वेगळा".
एक नवीन प्रजाति.
तुमची कहाणी
तुम्ही जशी सांगू शकता,
तशी ती इतर कुणीही सांगू शकणार नाही.
आणि मी ती ऐकेन.
धन्यवाद.
(टाळ्या)