स्वमग्नता [ऑटिझम] म्हणजे काय, हे अनेकांना ठाऊक असतं. उदाहरणार्थ, काही लोकांना वाटतं, की स्वमग्नता फक्त गोऱ्या पुरुषांच्यात आढळते, त्यांचं बोलणं एकसुरी असतं, आणि ते सतत एकाच विषयाबद्दल बोलत राहतात. काहींना वाटतं, की स्वमग्न लोकांना चूक आणि बरोबर यातला फरक समजत नाही. ते लक्ष वेधून घेणं टाळतात, आणि नेमकं चुकीच्या वेळी, चुकीचं बोलतात. काहींना वाटतं, की स्वमग्न लोकांना समाजात वावरता येत नाही. त्यांना विनोदबुद्धी किंवा समानुभूती नसते. हे सगळं तुम्हांला पटलं असेल, तर माफ करा, पण तुमची स्वमग्नतेबद्दलची कल्पना चुकीची आहे. मला कसं ठाऊक? कारण मला स्वमग्नता आहे. काही गोष्टी मला पछाडून टाकतात. उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक्स, किंवा सार्वजनिक वाहने. पण ही काही माझी ओळख नव्हे. प्रत्येक व्यक्ती आपल्या तऱ्हेने निराळी, एकमेव असते. परंतु स्वमग्न आयुष्य खरोखर कसं असतं, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्याचं साचेबंद वर्णन केलं जातं. बऱ्याच वेळा हे माध्यमांतून दिसून येतं. सर्वसाधारणपणे माध्यमांत दाखवलेली स्वमग्न लोकांची साचेबंद वर्णनं म्हणजे समाजात वावरता न येणारे, समानुभूती नसणारे, आणि अगदी अतिबुद्धिमान देखील. आणि स्वमग्नतेबद्दलचं अज्ञान इथे संपत नाही. काही लोक स्वमग्नतेवर इलाज शोधताहेत हे तुम्हांला ठाऊक आहे का? कारण ते स्वमग्नता म्हणजे एक नकारार्थी गोष्ट मानतात. जणु एखादा रोग. या कल्पनेला अनेकांनी आव्हान दिलं आहे. आणि आम्हांला विचाराल, तर आम्हांला तो रोग वाटत नाही. स्वमग्नता म्हणजे विचार करण्याची आणि जगाकडे पाहण्याची एक निराळी पद्धत. आमच्या मेंदूचं कार्य बहुसंख्य लोकांपेक्षा निराळ्या पद्धतीने चालतं. जणु एक्स बॉक्स आणि प्लेस्टेशन यात तुलना करतो आहोत, असं समजा. या दोन्ही साधनांजवळ उच्च क्षमता असली, तरी कार्यपद्धती निराळ्या आहेत. एक्स बॉक्सचा खेळ प्लेस्टेशनमध्ये चालणार नाही. कारण प्लेस्टेशनचं कार्य निराळ्या तऱ्हेने चालतं. मी आरशात पाहतो, तेव्हा मला दिसते एक निराळा विचार करणारी व्यक्ती. आणि हो, सुंदर केसही दिसतात. (हशा) (टाळ्या) आता प्रश्न असा, की माझी विचार करण्याची पद्धत निराळी आहे, म्हणजे मी रोगी आहे का? आजच्या समाजात एक स्वमग्न म्हणून जगताना जाणवणारी प्रमुख समस्या म्हणजे हे जग आमच्यासाठी रचलेलं नाही. आम्हांला अनेक प्रकारांनी परिस्थिती असह्य वाटू शकते. उदाहरणार्थ, मला नेहमीच मोठे आवाज असह्य होतात. म्हणून मी फार मोठ्या आवाजात संगीत लावत नाही. तसंच मला मोठे समारंभ आवडत नाहीत. पण स्वमग्नतेच्या वेगळ्या प्रकारांत, वेगळ्या गोष्टी असह्य वाटू शकतात. जसे की, प्रखर दिवे किंवा तीव्र वास, किंवा चिकट स्पर्श. या सर्वांमुळे चिंताविकार जडण्याची शक्यता असते. यापूर्वी तुम्ही कोणत्या सामाजिक समारंभांना हजर राहिला होतात, ते आठवा. तिथे मोठ्या आवाजात संगीत लावलं होतं का? फार प्रखर दिवे होते का? एकाच वेळी अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांचे वास येत होते का? एकाच वेळी अनेक संभाषणं सुरु होती का? या गोष्टींमुळे तुम्हां लोकांना त्रास झाला नसेल. पण स्वमग्नता असणाऱ्या व्यक्तीला या गोष्टी फार असह्य वाटू शकतात. अशा वेळी आम्ही पुनरावर्ती वर्तन करू लागतो. म्हणजे एखादी हालचाल किंवा आवाज पुन्हा पुन्हा करतो, चुळबुळ करतो. आमचं हे वागणं कधी साधं वाटतं, तर कधी विचित्र वाटतं. काहीजण जोरजोरात हात वरखाली हलवतात, काही आवाज काढतात, किंवा गिरक्या घेतात. भोवतालच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याची ही आमची पद्धत असते. अशा पुनरावर्ती वर्तनाची गरज आम्हांला अनेक वेळा वाटू शकते. पण ते पाहून लोक नापसंती दाखवतात. त्यामुळे आम्हांला ते लपवावं लागतं. स्वमग्नतेची ही लक्षणं अशी लपवावी लागतात, त्याला मुखवटा घालणं म्हणतात. काही लोक हे लपवण्यात जास्त कुशल असतात. मी काही वेळा हे इतकं छान लपवतो, की मला स्वमग्नता आहे हे मी सांगेपर्यंत त्यांना समजतही नाही. (हसतो.) एकंदरीत यामुळे फार तणाव वाटू शकतो. अगदी रात्री गृहपाठ करणंसुद्धा कष्टाचं वाटतं. आम्ही हे लपवू शकतो, त्यामुळे काही लोकांना वाटतं, की हाच यावर उपाय आहे. पण खरं तर लपवण्यामुळे, आमच्या खऱ्या स्वरूपात जगासमोर येण्याची आम्हांला शरम वाटते. स्वमग्नतेचं आणखी एक साचेबंद वर्णन म्हणजे, स्वमग्न लोकांना समानुभूती नसते. आणि पुन्हा सांगतो, हेदेखील खरं नाही. मला पुष्कळ समानुभूती वाटते. पण ती मला चांगल्या प्रकारे दाखवून देता येत नाही. एखादा मित्र जेव्हा त्याच्या आयुष्यातल्या समस्यांविषयी बोलत असतो, तेव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यावा, हे मला बरेचदा समजत नाही. आणि यामुळेच मी, स्वमग्न नसणाऱ्या मित्रांसारखी समानुभूती दाखवू शकत नाही. भावना व्यक्त करणं, कितीही कमी किंवा जास्त प्रमाणात का असेना, मला कठीण जातं. कारण एखाद्या व्यक्तीला सतत अनुभवाला येणाऱ्या सर्व भावनांचा कल्लोळ माझ्या मनात चाललेला असतो. पण अर्थातच मी त्या भावना तशा स्वरूपात व्यक्त करू शकत नाही. नाहीतर काय होईल, आनंदाची भावना व्यक्त होताना एक मोठी जोरकस शीळ वाजेल, हात जोरजोराने फडफडतील, आणि जोरदार हू.. हू.. आवाज येईल. (हशा) पण तुम्ही याऐवजी फक्त स्मित कराल. (हशा) वाढदिवसाला मिळालेली सुंदर भेट असो, किंवा बातम्यांत ऐकलेली एखादी वाईट बातमी असो, भावनांचा कल्लोळ झाल्याशिवाय मला प्रतिक्रिया देता येत नाही. सामान्य व्यक्तीसारखं दिसावं, म्हणून मला हे लपवावं लागतं. माझ्या मनात अमर्याद भावना असतात. पण मी एकतर टोकाला जाऊन त्या व्यक्त करतो, किंवा अजिबातच करत नाही. म्हणजे, भावना व्यक्त करणं मला फारसं जमत नाही. मी निराळ्या तऱ्हेने संवाद साधतो. म्हणून मला स्वमग्नता आहे, असं निदान झालं. माझ्या मनाचं कार्य कसं चालतं, हे या निदानाच्या आधाराने मला, माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना समजतं. जागतिक लोकसंख्येच्या साधारण एक टक्का लोकांना स्वमग्नता असल्याचं निदान केलं जातं. आणि हा आकडा वाढतो आहे. पण तरीही अजून आम्ही अल्पसंख्यांक आहोत. आज अनेक लोक आम्हांला इतरांच्या बरोबरीचे समजत नाहीत. हे माझं कुटुंब. आणि माझ्या कुटुंबात आणखी एक व्यक्ती स्वमग्न आहे. माझी आई. हो. प्रौढ स्त्रियादेखील स्वमग्न असू शकतात. माझे वडील आणि भाऊ स्वमग्न नाहीत. तरीसुद्धा, एकमेकांशी संवाद साधणं कधी कधी कठीण जातं. उदाहरणार्थ, मी म्हणतो, "टोरांटोचं युनियन स्टेशन, हो ना?" मला वाटतं, की यामुळे त्यांना त्याबद्दल काहीतरी आठवेल. पण ते गोंधळले, की मला नीट खुलासा करावा लागतो. अनेकदा, सर्वांना समजावं म्हणून आम्ही त्याच गोष्टी निरनिराळ्या प्रकारांनी बोलतो. असं असलं तरीसुद्धा आम्ही एकमेकांना समान लेखून प्रेमाने,आदराने वागतो. "न्यूरो ट्राइब्स" या पुस्तकात लेखक स्टीव्ह सिलबरमन म्हणतात, स्वमग्नतेसारख्या मानसिक अवस्थांना नैसर्गिक मानवी मानसिकतांच्या समूहातला एक भाग मानलं पाहिजे, कमतरता नव्हे. आणि या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे. स्वमग्नता हा नैसर्गिक मानवी स्थितींच्या समूहातला एक भाग मानला, तर स्वमग्न लोकांना सहज वावरता येण्यासारखं जग निर्माण करता येईल. मला माझ्या स्वमग्नतेची शरम वाटत नाही. मी तुमच्यासारखा विचार करत नसेन, किंवा तुमच्यासारखा वागत नसेन. पण मीही एक माणूसच आहे. मला कोणताही रोग झालेला नाही. धन्यवाद. (टाळ्या)