< Return to Video

तुमच्या पूर्वजांना कोणते अन्न आवडत होते?

  • 0:00 - 0:05
    गेल्या वर्षी मी भारतातल्या
    एका आदिवासी कुटुंबात राहत होते.
  • 0:07 - 0:08
    एका दुपारी
  • 0:08 - 0:11
    त्यांचा छोटा मुलगा जेवत होता,
  • 0:11 - 0:16
    आणि मला पाहिल्याबरोबर त्याने
    लगबगीने भाजी आपल्या पाठीमागे लपवली.
  • 0:17 - 0:21
    तो काय खात होता ते मला दाखवावं
    म्हणून फार आग्रह करावा लागला.
  • 0:22 - 0:25
    त्या पतंगाच्या अळ्या होत्या.
  • 0:25 - 0:29
    माडिया आदिवासींचे
    हे एक पारंपारिक पक्वान्न.
  • 0:29 - 0:31
    मी ओरडले,
  • 0:31 - 0:33
    "अरे देवा! या खातो आहेस तू!
  • 0:33 - 0:35
    माझ्यासाठी थोड्या शिल्लक आहेत ना?"
  • 0:36 - 0:39
    त्या मुलाने अविश्वासाने माझ्याकडे पाहिलं.
  • 0:39 - 0:41
    "तुम्ही.. या खाता?"
  • 0:42 - 0:45
    "मला या फार आवडतात!" मी उत्तर दिले.
  • 0:47 - 0:50
    यावर त्याचा जराही विश्वास बसला नाही
    हे मला स्पष्ट दिसत होते.
  • 0:51 - 0:55
    एका शहरी सुशिक्षित महिलेला
    त्याच्यासारखे अन्न आवडणे कसे शक्य आहे?
  • 0:57 - 1:00
    नंतर मी त्याच्या वडिलांकडे हा विषय काढला.
  • 1:00 - 1:03
    आणि ते प्रकरण फारच संवेदनशील निघाले.
  • 1:05 - 1:07
    त्याचे वडील म्हणाले,
  • 1:07 - 1:10
    "माझ्या फक्त ह्याच एका मुलाला
    हे खाणे आवडते.
  • 1:10 - 1:13
    आम्ही त्याला सांगतो,
    'ते खाऊ नकोस. ते वाईट असते.'
  • 1:13 - 1:15
    पण तो ऐकत नाही.
  • 1:15 - 1:18
    हे सर्व खाणे आम्ही
    बऱ्याच काळापूर्वी सोडून दिले आहे."
  • 1:20 - 1:22
    "का?" मी विचारले.
  • 1:23 - 1:25
    "हे तुमचे पारंपारिक अन्न आहे.
  • 1:26 - 1:29
    हे तुमच्या परिसरात उपलब्ध आहे.
  • 1:29 - 1:30
    हे पौष्टिक आहे.
  • 1:30 - 1:33
    आणि मी खात्रीने सांगू शकते, की
    हे स्वादिष्ट आहे.
  • 1:34 - 1:36
    हे खाण्यात काय चूक आहे?"
  • 1:37 - 1:38
    ते निःशब्द झाले.
  • 1:39 - 1:41
    मी विचारले,
  • 1:41 - 1:45
    "तुम्हांला सांगितले गेले आहे का, की
    तुमचे अन्न वाईट आहे,
  • 1:45 - 1:48
    किंवा ते खाणे हा मागासलेपणा आहे,
  • 1:48 - 1:50
    असंस्कृत आहे?"
  • 1:52 - 1:54
    त्यांनी शांतपणे मान हलवली.
  • 1:55 - 2:01
    भारतातील आदिवासी लोकांबरोबर काम करताना
    अनेकदा घडले होते, तसे याही प्रसंगी
  • 2:01 - 2:04
    मला अन्नाबद्दल वाटणारी शरम दिसून आली.
  • 2:05 - 2:08
    शरमेमागचा समज असा, की
    आपल्याला अतिशय आवडणारे,
  • 2:08 - 2:11
    आपल्या अनेक पिढ्यांनी खाल्लेले अन्न
  • 2:11 - 2:13
    हे काही कारणामुळे निकृष्ठ असावे,
  • 2:13 - 2:15
    मानवासाठी योग्य नसावे.
  • 2:16 - 2:21
    आणि ही शरम फक्त विचित्र, किळसवाण्या
    अन्नापुरती सीमित नाही,
  • 2:21 - 2:24
    म्हणजे कीटक किंवा उंदीर वगैरे,
  • 2:24 - 2:27
    तर ती सर्वसाधारण अन्नालाही लागू आहे.
  • 2:27 - 2:29
    रानटी भाज्या,
  • 2:29 - 2:32
    अळंबी, फुले --
  • 2:32 - 2:36
    थोडक्यात, शेतात पिकवले न जाता
    गोळा केले जाणारे काहीही.
  • 2:37 - 2:41
    भारतातील आदिवासींमध्ये
    ही शरम सर्वत्र आढळते.
  • 2:42 - 2:44
    कोणत्याही कारणाने ती बळावते.
  • 2:44 - 2:49
    एका शाळेत एका उच्चवर्णी
    शाकाहारी शिक्षकांची नेमणूक झाली.
  • 2:49 - 2:54
    काही आठवड्यांत मुले पालकांना सांगू लागली,
    की खेकडे खाणे हे घाणेरडे आहे.
  • 2:54 - 2:55
    किंवा मांस खाणे हे पाप आहे.
  • 2:56 - 3:00
    एका सरकारी पौष्टिक अन्न योजनेद्वारे
    मऊ पांढरा भात पुरवला जातो.
  • 3:00 - 3:03
    आता कोणालाही लाल तांदूळ
    किंवा ज्वारी बाजरी खावीशी वाटत नाही.
  • 3:04 - 3:09
    एका गावात एक सेवाभावी संस्था गर्भवती
    मातांसाठी आदर्श आहाराचे तक्ते घेऊन गेली.
  • 3:09 - 3:11
    त्याचा परिणाम लगेच झाला.
  • 3:11 - 3:13
    सगळ्या गर्भवती माता दुःखी झाल्या.
  • 3:13 - 3:16
    सफरचंद आणि द्राक्षे
    परवडणार नाहीत या विचाराने.
  • 3:16 - 3:19
    आणि त्यांना इतर फळांचा विसर पडला,
  • 3:19 - 3:21
    जी जंगलातून गोळा करून आणणे शक्य असते.
  • 3:23 - 3:24
    आरोग्य सेवक,
  • 3:25 - 3:27
    धर्म प्रचारक,
  • 3:27 - 3:30
    कोणी सरकारी कर्मचारी,
  • 3:30 - 3:33
    आणि त्यांची स्वतःची सुशिक्षित मुलेसुद्धा
  • 3:33 - 3:37
    या आदिवासींना अक्षरशः ओरडून सांगताहेत
  • 3:37 - 3:41
    की त्यांचे अन्न पुरेसे चांगले नाही.
  • 3:41 - 3:42
    ते पुरेसे सुसंस्कृत नाही.
  • 3:43 - 3:46
    आणि त्यामुळे हळू हळू थोडे थोडे अन्न
  • 3:47 - 3:49
    नाहीसे होत आहे.
  • 3:50 - 3:54
    मला प्रश्न पडतो,
    तुम्ही कधी विचारात घेतले आहे का,
  • 3:54 - 3:58
    की तुमच्याही समाजांमध्ये
    अन्नाचा असाच इतिहास असू शकतो.
  • 3:59 - 4:03
    तुम्ही तुमच्या ९० वर्षांच्या आजीशी बोललात,
  • 4:04 - 4:07
    तर तुम्ही कधी न पाहिलेल्या वा ऐकलेल्या
    अन्नाविषयी ती बोलेल का?
  • 4:09 - 4:11
    तुम्हांला कल्पना आहे का,
    तुमच्या समाजाचे किती अन्न
  • 4:11 - 4:13
    तुम्हांला आज उपलब्ध नाही?
  • 4:15 - 4:16
    स्थानिक तज्ज्ञ मला सांगतात,
  • 4:17 - 4:22
    दक्षिण आफ्रिकेतली अन्नाची अर्थव्यवस्था
    आज पूर्णपणे आयात अन्नावर आधारित आहे.
  • 4:23 - 4:26
    मका हे मुख्य अन्न झाले आहे,
  • 4:26 - 4:32
    तर स्थानिक ज्वारी, बाजरी, कंद
    हे सर्व नष्ट झाले आहेत.
  • 4:32 - 4:35
    तशीच जंगलात उगवणारी कडधान्ये आणि भाज्या.
  • 4:35 - 4:39
    लोक बटाटे आणि कांदे ,
    कोबी आणि गाजर खाताहेत.
  • 4:40 - 4:42
    माझ्या देशात
  • 4:42 - 4:45
    अन्नाचा हा ऱ्हास
    प्रचंड प्रमाणावर झालेला आहे.
  • 4:45 - 4:49
    आधुनिक भारत अडकला आहे तांदूळ, गहू
  • 4:49 - 4:51
    आणि मधुमेह यांच्या विळख्यात.
  • 4:52 - 4:57
    आपण काही अन्न पूर्णपणे विसरून गेलो आहोत.
    उदाहरणार्थ, विविध प्रकारचे कंद,
  • 4:57 - 5:01
    झाडांचे गोंद, मासे, कवचधारी मासे,
  • 5:01 - 5:03
    तेलबिया,
  • 5:03 - 5:07
    गोगलगायसदृश प्राणी, अळंबी, कीटक,
  • 5:07 - 5:10
    नामशेष न झालेल्या छोट्या प्राण्यांचे मांस.
  • 5:10 - 5:15
    हे सर्व आमच्या परिसरात उपलब्ध होते.
  • 5:16 - 5:18
    मग हे सर्व अन्न कुठे गेले?
  • 5:19 - 5:22
    अन्नधान्याच्या आपल्या आधुनिक टोपल्या
    इतक्या आखूड कशा झाल्या?
  • 5:23 - 5:29
    आपण गुंतागुंतीच्या राजकीय, अर्थशास्त्रीय
    आणि पर्यावरणवादी कारणांविषयी बोलू शकतो.
  • 5:29 - 5:33
    पण मी शरम या मानवी भावनेविषयी बोलणार आहे.
  • 5:35 - 5:38
    कारण शरम हा निर्णायक बिंदू असतो,
  • 5:38 - 5:42
    जिथे अन्न खरोखर
    तुमच्या ताटातून नाहीसे होते.
  • 5:43 - 5:45
    शरम काय करते?
  • 5:46 - 5:49
    शरम तुम्हांला खुजे वाटायला लावते,
  • 5:49 - 5:50
    दुःखी,
  • 5:50 - 5:51
    नालायक,
  • 5:51 - 5:53
    अवमानवी.
  • 5:54 - 5:58
    शरम आकलनात विसंगती निर्माण करते.
  • 5:58 - 6:00
    ती अन्नविषयक सत्याचा विपर्यास करते.
  • 6:01 - 6:03
    आपण हे एक उदाहरण घेऊ.
  • 6:04 - 6:06
    तुम्हांला हे आवडेल का?
  • 6:07 - 6:09
    एक अद्भुत, विविधोपयोगी प्राथमिक अन्न,
  • 6:10 - 6:13
    जे तुमच्या परिसरात विपुलतेने उपलब्ध आहे.
  • 6:13 - 6:15
    तुम्हांला फक्त ते गोळा करावे लागेल,
  • 6:15 - 6:18
    वाळवावे लागेल, साठवावे लागेल.
  • 6:18 - 6:20
    मग ते तुम्हांला वर्षभर पुरेल.
  • 6:20 - 6:24
    तुम्ही त्यापासून हवे तितके
    विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकाल.
  • 6:25 - 6:29
    भारतात असेच एक अन्न होते, महुआ.
  • 6:29 - 6:30
    हे त्याचे फूल.
  • 6:31 - 6:35
    गेली तीन वर्षे
    मी या अन्नावर संशोधन करत आहे.
  • 6:36 - 6:40
    हे अतिशय पौष्टिक आहे,
    हे आदिवासी परंपरा जाणते,
  • 6:40 - 6:42
    तसेच विज्ञानही जाणते.
  • 6:43 - 6:45
    आदिवासींसाठी
  • 6:45 - 6:49
    वर्षातले चार ते सहा महिने
    हे मुख्य अन्न असे.
  • 6:51 - 6:54
    हे अनेक प्रकारे तुमच्या
    स्थानिक मरुला सारखे आहे.
  • 6:54 - 6:57
    फरक इतकाच, की हे फूल आहे, फळ नव्हे.
  • 6:58 - 7:00
    जिथे जंगले समृद्ध असतात,
  • 7:00 - 7:04
    तिथे लोकांना खाण्यासाठी
    वर्षभर भरपूर अन्न तर मिळतेच,
  • 7:04 - 7:05
    आणि विकण्यासाठीही पुरेसे शिल्लक राहते.
  • 7:06 - 7:11
    मला महुआचे ३५ प्रकारचे पदार्थ सापडले,
  • 7:11 - 7:14
    जे आता कोणीही बनवत नाही.
  • 7:15 - 7:20
    हे अन्न आता अन्न म्हणून
    ओळखलेसुद्धा जात नाही,
  • 7:20 - 7:22
    तर दारूसाठी कच्चा माल म्हणून ओळखले जाते.
  • 7:23 - 7:26
    हे घरात बाळगण्यासाठी अटक होऊ शकते.
  • 7:26 - 7:29
    कारण? शरम.
  • 7:29 - 7:33
    भारतभर सर्वत्र मी आदिवासींशी बोलले,
  • 7:33 - 7:35
    महुआ खाणे बंद का झाले याविषयी.
  • 7:36 - 7:38
    आणि मला सगळीकडे तेच एक उत्तर मिळाले.
  • 7:39 - 7:42
    "आम्ही दरिद्री, भुकेकंगाल होतो,
    तेव्हा ते खात होतो.
  • 7:43 - 7:45
    आता आम्ही ते का खावं?
  • 7:45 - 7:47
    आमच्याजवळ तांदूळ किंवा गहू आहे."
  • 7:49 - 7:51
    आणि त्याच एका दमात,
  • 7:51 - 7:54
    महुआ किती पौष्टिक आहे
    हेही लोक मला सांगतात.
  • 7:55 - 7:58
    कोणी वृद्ध पूर्वी महुआ खात,
    त्यांच्या गोष्टी नेहमीच ऐकायला मिळतात.
  • 7:59 - 8:03
    "आमच्या आजीला दहा मुले होती.
  • 8:03 - 8:08
    तरीही ती किती कष्ट करत असे.
    कधी दमली नाही, की आजारी पडली नाही."
  • 8:09 - 8:14
    प्रत्येक ठिकाणी अगदी हेच दुहेरी बोलणे.
  • 8:15 - 8:16
    हे कसे काय?
  • 8:16 - 8:19
    तेच अन्न
  • 8:19 - 8:24
    एकाच वेळी अतिशय पौष्टिक
    आणि गरिबांचे अन्न कसे ठरते,
  • 8:24 - 8:26
    तेही एका वाक्यात?
  • 8:27 - 8:29
    जंगलातल्या इतर अन्नाचीही हीच कथा.
  • 8:30 - 8:33
    मी एकामागून एक
    हृदयद्रावक कहाण्या ऐकल्या आहेत.
  • 8:33 - 8:36
    दुष्काळ आणि उपासमारीच्या कहाण्या.
  • 8:36 - 8:39
    जंगलातून गोळा केलेल्या कचऱ्यामुळे
    जीव वाचल्याच्या कहाण्या.
  • 8:40 - 8:42
    अन्न नव्हते, म्हणून.
  • 8:43 - 8:45
    थोडे जास्त खोलात शिरल्यावर मला कळले,
  • 8:45 - 8:49
    की अभाव सर्व अन्नाचा नव्हता,
  • 8:49 - 8:52
    तर फक्त शिष्टसंमत अन्नाचा, जसे तांदूळ.
  • 8:52 - 8:54
    मी त्यांना विचारले,
  • 8:54 - 8:58
    "तुम्ही ज्याला कचरा म्हणता,
    तो खाण्यास योग्य आहे हे कसे कळले?
  • 8:59 - 9:04
    तुम्हांला कोणी सांगितले, की
    ते विशिष्ट कडू कंद गोड करण्यासाठी
  • 9:04 - 9:06
    रात्रभर प्रवाहात ठेवावे?
  • 9:07 - 9:10
    किंवा गोगलगायीच्या कवचातले
    मांस कसे काढावे?
  • 9:10 - 9:13
    किंवा जंगली उंदिरासाठी सापळा कसा लावावा?"
  • 9:14 - 9:17
    मग ते आपली डोकी खाजवू लागतात,
  • 9:17 - 9:20
    आणि त्यांच्या लक्षात येते, की
    आपण हे वडिलधाऱ्यांकडून शिकलो आहोत.
  • 9:21 - 9:27
    कित्येक शतके आपले पूर्वज
    या अन्नावर जगत होते, प्रगती करत होते.
  • 9:27 - 9:29
    तांदूळ मिळण्यापूर्वी.
  • 9:29 - 9:33
    आणि ते आपल्या या पिढीपेक्षा
    कितीतरी निरोगी होते.
  • 9:34 - 9:36
    अशी ही अन्नाची कहाणी.
  • 9:38 - 9:39
    ही आहे शरमेची करामत:
  • 9:39 - 9:46
    लोकांच्या आयुष्यातून, आठवणीतून
    अन्न आणि अन्न परंपरा नाहीशा करणे.
  • 9:46 - 9:48
    त्यांना जाणीवही होऊ न देता.
  • 9:50 - 9:53
    हा कल कसा पालटावा?
  • 9:54 - 10:00
    आपल्या नैसर्गिक अन्नवापराच्या सुंदर,
    व्यामिश्र पद्धती परत कशा मिळवाव्यात?
  • 10:01 - 10:06
    धरणीमातेने तिच्या निसर्गचक्रानुसार
    आपल्याला प्रेमाने दिलेले अन्न,
  • 10:07 - 10:11
    जे आपल्या आज्यापणज्यांनी आनंदाने रांधले,
  • 10:11 - 10:14
    आणि आपल्या पितामहांनी जे कृतज्ञतेने खाल्ले
  • 10:15 - 10:19
    असे पौष्टिक, स्थानिक, नैसर्गिक अन्न,
  • 10:20 - 10:22
    विविधतेने नटलेले, स्वादिष्ट अन्न,
  • 10:22 - 10:25
    जे पिकवावे लागत नाही,
  • 10:25 - 10:27
    जे पर्यावरणाची हानी करत नाही,
  • 10:28 - 10:29
    ज्यासाठी काही खर्च येत नाही?
  • 10:30 - 10:32
    या अन्नाची आपल्या सर्वांना गरज आहे,
  • 10:32 - 10:35
    मला वाटते, त्याचे कारण
    मी तुम्हांला सांगायला नको.
  • 10:36 - 10:40
    जागतिक आरोग्यविषयक संकटाबद्दल
    मी सांगण्याची गरज नाही.
  • 10:40 - 10:43
    हवामान बदल, पाणीविषयक संकट
  • 10:43 - 10:44
    मातीचा कस कमी होणे,
  • 10:44 - 10:46
    कोलमडलेल्या शेतकी व्यवस्था,
  • 10:46 - 10:47
    हे सर्व.
  • 10:48 - 10:52
    पण माझ्यासाठी, या अन्नाच्या गरजेमागची
    दुसरी काही कारणे तितकीच महत्त्वाची आहेत,
  • 10:52 - 10:54
    जी आपल्याला मनात खोलवर जाणवतात,
  • 10:55 - 10:58
    कारण अन्न हे बरेच काही असते.
  • 10:58 - 11:02
    अन्न म्हणजे पुष्टी, समाधान,
  • 11:02 - 11:05
    सृजनशीलता, समाज,
  • 11:05 - 11:09
    आनंद, सुरक्षितता, स्वत्व
  • 11:09 - 11:10
    आणि इतरही बरेच काही.
  • 11:11 - 11:13
    आपण अन्नाशी कसा संबंध जोडतो
  • 11:13 - 11:15
    यावर आयुष्यात बरेचसे काही अवलंबून असते.
  • 11:16 - 11:18
    त्यावरून आपण आपल्या शरीराशी
    कसा संबंध जोडतो हे ठरते,
  • 11:19 - 11:21
    कारण आपले शरीर म्हणजे शेवटी अन्नच असते.
  • 11:22 - 11:26
    अन्न हे एक मूलभूत संबंध जोडते,
  • 11:26 - 11:27
    आपल्या अस्तित्वाशी.
  • 11:28 - 11:32
    या अन्नाची आज सर्वात जास्त गरज आहे.
  • 11:32 - 11:35
    मानवप्राणी म्हणून आपल्या अस्तित्वाची
    नवी व्याख्या करण्यासाठी
  • 11:35 - 11:38
    निसर्गरचनेचा एक भाग या नात्याने.
  • 11:39 - 11:41
    आज या नव्या व्याख्येची गरज आहे का?
  • 11:44 - 11:48
    माझ्यासाठी, एकमेव खरे उत्तर आहे प्रेम.
  • 11:49 - 11:54
    कारण प्रेम ही शरमेला विरोध करणारी
    एकमेव गोष्ट आहे.
  • 11:56 - 12:00
    आपल्या अन्नाशी असणाऱ्या संबंधात
    जास्त प्रेम कसे आणावे?
  • 12:02 - 12:06
    माझ्यासाठी, प्रेम म्हणजे प्रामुख्याने
  • 12:06 - 12:10
    वेग जरा कमी करण्याची इच्छा.
  • 12:11 - 12:14
    आपला वेळ देऊन
  • 12:14 - 12:18
    संवेदना जाणवू देणे, ऐकणे, माहिती विचारणे.
  • 12:20 - 12:22
    स्वतःच्या शरीराचे संकेत ऐकणे
    हेही प्रेम म्हणता येईल.
  • 12:23 - 12:30
    आपल्या शरीरांच्या काय गरजा असतात,
    खाण्याच्या सवयी, कल्पना,
  • 12:30 - 12:32
    आणि व्यसनांच्या मुळाशी?
  • 12:32 - 12:36
    या कल्पना तपासून पाहण्यासाठी वेळ देणे,
    हेही प्रेम असू शकेल.
  • 12:37 - 12:39
    त्या कल्पना कुठून आल्या?
  • 12:40 - 12:42
    त्यासाठी कदाचित बालपणात मागे जावे लागेल.
  • 12:43 - 12:45
    त्या वेळी कोणते अन्न आवडत होते?
  • 12:46 - 12:47
    आता काय बदलले आहे?
  • 12:48 - 12:53
    कदाचित प्रेम म्हणजे एखादी शांत संध्याकाळ
    वडिलधाऱ्यांबरोबर घालवणे असेल.
  • 12:53 - 12:56
    त्यांच्या अन्नविषयक आठवणी ऐकणे,
  • 12:56 - 12:59
    त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात
    त्यांना मदत करणे,
  • 12:59 - 13:00
    आणि एकत्र भोजन घेणे.
  • 13:02 - 13:06
    हे प्रेम म्हणजे आठवण ठेवणे, की
  • 13:06 - 13:08
    मानवता अथांग आहे,
  • 13:08 - 13:10
    आणि अन्नविषयक निवडी भिन्न असू शकतात.
  • 13:11 - 13:15
    प्रेम म्हणजे आदर आणि जिज्ञासा दाखवणे.
  • 13:15 - 13:17
    दोषारोप करणे नव्हे,
  • 13:17 - 13:20
    कोणी एखादे पूर्णपणे अनोळखी अन्न
    खात असेल त्यावेळी.
  • 13:22 - 13:26
    प्रेम म्हणजे चौकशी करण्यासाठी वेळ देणे,
  • 13:27 - 13:28
    माहिती काढणे,
  • 13:28 - 13:30
    संबंध जोडणे.
  • 13:31 - 13:35
    फेनबॉस जंगलात शांतपणे फेरफटका करणे.
  • 13:35 - 13:40
    एखादे झाड आपल्याशी बोलते का, ते पाहणे.
  • 13:40 - 13:41
    तसे घडते.
  • 13:41 - 13:43
    माझ्याशी झाडे नेहमी बोलतात.
  • 13:45 - 13:46
    सर्वात महत्त्वाचे,
  • 13:47 - 13:51
    ही छोटी छोटी संशोधनाची पावले
  • 13:51 - 13:55
    आपल्याला मोठ्या उत्तराकडे नेऊ शकतील
    असा विश्वास बाळगणे.
  • 13:56 - 13:58
    कधी ही उत्तरे अतिशय आश्चर्यकारक असू शकतील.
  • 14:00 - 14:02
    एकदा एका आदिवासी
    वैदू स्त्रीने मला सांगितले,
  • 14:03 - 14:06
    प्रेम म्हणजे, धरणीमातेवर पावले टाकताना,
  • 14:06 - 14:09
    आपण तिचे सर्वात लाडके मूल आहोत
    अशा भावनेने चालणे.
  • 14:10 - 14:14
    असा विश्वास बाळगणे, की
    ती प्रामाणिक हेतूंचा आदर करते,
  • 14:15 - 14:17
    आणि आपल्या पावलांना
    कसे मार्गदर्शन करावे हे ती जाणते.
  • 14:18 - 14:20
    आशा आहे, की
    मी तुम्हांला प्रेरणा दिली असेल,
  • 14:20 - 14:23
    पूर्वजांच्या अन्नाशी संबंध जोडण्यासाठी.
  • 14:23 - 14:24
    ऐकण्याबद्दल धन्यवाद.
  • 14:25 - 14:27
    (टाळ्या)
Title:
तुमच्या पूर्वजांना कोणते अन्न आवडत होते?
Speaker:
अपर्णा पल्लवी
Description:

शेतीचे औद्योगिकीकरण आणि आदर्श आहाराच्या बदलत्या, पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव असणाऱ्या कल्पनांमुळे जगभरात आदिम अन्न संस्कृती नष्ट होत आहेत.

एकेकाळी अत्यावश्यक असणाऱ्या स्वयंपाकाच्या परंपरा लोकांच्या जीवनातून, आठवणींतून अचानक नाहीशा का होताहेत याचा वेध घेतला आहे, अन्न संशोधक अपर्णा पल्लवी यांनी. आपल्या अन्नाशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी त्यांनी एक मार्मिक उत्तर सुचवले आहे.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
14:40

Marathi subtitles

Revisions